या गॅझेटमध्ये एक एरर होती.

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१२

संस्कार म्हंजे काय रं भाऊ!

                                                         संस्कार म्हंजे काय रं भाऊ!
              प्राण्यांमध्ये फक्त माणुसच संस्काराबद्दल ग्वाही देतो. बुद्धीचा वापर केल्यामुळे माणसाचे जनावरातून मानवात रूपांतर झाले. सृष्टीने जे काही बदल केले ते सोडले तर बाकीच्या प्राण्यांमध्ये काही फरक पडलेला नाही. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून माणूस स्वत:मध्ये बदल घडवित गेला.
             स्वत:चे शारिरीक दुर्बल्य ओळखून माणसाने एकतेतली ताकत ओळखून एकमेकांशी सहकार्य करायला, टोळी बनवून, सुरुवात केली. आपलं भलं कशात आहे, हे ओळखण्याची सारासार बुद्धी माणसाने वापरली, हेच मानवाच्या प्रगतीचे मुख्य कारण आहे.
             या सारासार बुद्धीतूनच संस्काराचा जन्म झाला. जीव वाचविण्यासाठी आवश्यक असणरा ’ऍनिमल इन्स्टिंक्ट’ तर जन्मजातच मिळतो. पण सहकार्य फक्त जीव वाचविण्यापूरतेच मर्यादित न ठेवता माणसाने त्याचा प्रगतीसाठी उपयोग केला. सहकार यशस्वी होण्यासाठी माणसाने कसे वागावे, यासाठी दिलेले ज्ञान म्हणजेच संस्कार.
निष्ठा .
           टोळीच्या (आता राष्ट्राच्या) हिताशी निष्ठा असावी, असा संस्कार असायला पाहिजे. पण हित कशात आहे, हे ठरविणे प्रत्येकाला शक्यच असते, असे नाही. त्यामुळे टोळीप्रमुखावर ’हिता’ची जबाबदारी ठेवून प्रमुखाप्रती निष्ठा ठेवली जाते. मुख्य म्हणजे जशी निराकार देवाची संकल्पना सर्वसामान्य माणसाला कळणे कठिण जाते म्हणून देवांच्या मूर्तींची निर्मिती झाली तशाच प्रकारे राष्ट्राची संकल्पना राष्ट्र प्रमुखाशी जोडली गेली.
विश्वासार्हता.
           सहकारात विश्वासार्हता महत्वाची आहे म्हणून खरे बोलावे. लहानपणी एवढेच सांगितले जाते. मोठे झाल्यावर खरे कुठे बोलावे याचाही उहापोह केला जातो. शत्रुशी सहकार्य करायचं नसतं, हा खरं म्हणजे ’ऍनिमल इन्स्टिंक्ट’चा भाग आहे आणि म्हणूनच युधिष्ठिर, ’नरो वा कुंजरो वा’ करत का होईना, खोटे बोलले.
त्याग.
           आपल्या समाजासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देणे म्हणजे सहकाराची चरम सीमा! त्यागाचा जन्म निष्ठेतून होतो. हजारो वर्षांच्या इतिहासात अगणित लोकांनी केलेल्या त्यागामुळेच आज आपण मानव पृथ्वीवर ’राज्य’ करतो आहोत. या मूलभूत तत्वांवर आधारित संस्कारांमुळेच मानवाची प्रगती झालेली आहे.
स्वार्थाचा दुर्गुण
              दररोजच्या जिवनात आपण संस्कारांचे उल्लंघन होतांना पाहतो. सर्वच माणसे नि:स्वार्थी असती तर माणसाने केव्हांच स्वर्ग निर्माण केला असता. स्वार्थ हा मानवाचा सर्वात मोठा दुर्गुण! आपण राष्ट्राचे प्रतिक आहोत, हे जेव्हां जेव्हां सतांधुंद झालेले नेते विसरतात तेव्हां तेव्हां मानवाच्या प्रगतीला खीळ बसलेली दिसते. पण मानव-समाज अशा नेतृत्वाला हटवून समाजाभिमुख नेतृत्व आणतात. नेतृत्व निवडीत चूक झाली तर ती सुधारण्यास मह्त्प्रयास लागतात. पण चुका करणे म्हणजेच माणुस असणे असल्यामुळे प्रगतीची गाडी गचके खात खातच पुढे जात राहते.
क्रांती
              देव म्हणजे चांगले आणि दानव म्हणजे वाईट असे समजले तर मानव म्हणजे चांगल्या-वाईटाचे मिश्रणच, नाही का!
               माणुस कितीही प्रगत झाला तरी त्याच्यातला ’ऍनिमल इन्स्टिंक्ट’ जागाच असतो. त्यामुळे ’वाईट’ लोक जेव्हां सत्तेवर येतात तेव्हां तो ’ऍनिमल इन्स्टिंक्ट’ त्या सत्तेविरुद्ध क्रांती घडवून आणतो. उदा: फ़्रांस, रशिया, व चीनमधली क्रांती.
कर्तबगार राज्यकर्ते
राज्यपद्धती राजेशाही, लोकशाही किंवा साम्यवादी असो, कर्तबगार व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रात काम करण्याची संधी व सवलती मिळत राहिल्या तर समाजाची प्रगती होत राहते. थोडक्यात म्हणजे कर्तबगार व्यक्तींना ’राजाश्रया’ची आवश्यकता असते.
संस्काराच्या मर्यादा
               मानव-समाज संस्काराला इतके महत्व देत असतांना ’वाईट’ माणसे निपजण्याचे कारण माणसाच्या दुष्प्रवृत्तीत आहे. संस्काराने दिलेला आदेश/उपदेश पाळायचाच असतो म्हणून किंवा न पाळल्यास काहितरी वाईट होईल, या भितीने सत्प्रवृत्तेचे लोक संस्कारी होतात. सत्प्रवृत्त लोकांना काही जण भित्रे/मवाळ म्हणूनही हिणवितात. आदेश/उपदेश मानले नाहित तर पाहू, काय होते ते?, असे म्हणणारे बंडखोर असतात, ते समाजाची शिस्त मोडतात व समाजाचे अशा बंडखोरीकडे दुर्लक्ष झाले तर सत्ताही हस्तगत करतात.
शिस्तीची अंमलबजावणी
           संस्कार हे समाजाला शिस्तीत ठेवण्याचे साधन आहे. पण नुसते संस्कार करून समाजात शिस्त राहत नाही; शिस्तीबाहेर जाणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचा संस्कारही अंमलात आणला गेला तर समाजाच्या प्रगतीत बाधा येत नाही.
संस्कार मानवाने निर्माण केले आहेत तर प्रवृत्ती देवाची देणगी आहे. संस्कार सत्प्रवृत्तिच्या लोकांना एकत्र आणून दुष्प्रवृत्तीवर मात करून समाजाची प्रगती करण्याचा प्रयत्न करतात. मानवाने निर्माण केलेली ही ऍप (अप्लिकेशन) प्रवृत्तीच्या प्रोसेसरवर मर्यादित प्रभाव पाडू शकते. सत्प्रवृत्तीचा नेता अधिकारावर आला असतांना समाजाने प्रगती केलेली इतिहासात नमूद केलेली आहे.
               ’लोकांना त्यांच्या लायकीचे नेते मिळतात’, असे म्हंटले जाते, ते खरेच आहे. नुसते सर्वसाधारण जनतेला संस्कारित करून चालणार नाही तर अशा संस्कारित लोकांना प्रगतीसाठी सता वापरण्याचे धाडस असणाऱ्या नेत्यांच्या हाती सत्ता सोपविण्याचे शिक्षणही दिले गेले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: