या गॅझेटमध्ये एक एरर होती.

शनिवार, २१ जून, २०१४

पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू

पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू
               माणूस सामाजिक प्राणि आहे. त्याला सोबत लागते. नातेवाईक, मित्र, शेजारी आणि पाळतू जनावरांमध्ये सुद्धा आपण सोबत शोधत असतो. एकटे असतांना मन अघोरी विचार करू शकते. ’एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप’, नाही का! सोबतीमुळे आपल्याला आनंद मिळतो, दु:ख कमी होते. आपल्या नडीच्या वेळी जो कामी येतो, तो खरा मित्र!
              एकमेकांच्या सुख-दु:खात आपण सहभागी होतो. फोन/टेक्स्ट/पत्र याद्वारे अप्रत्यक्षपणे आपण शुभचिंतन/सांत्वन करतो. कौटुंबिक प्रसंगात एकमेकांच्या घरी जातो. शुभ प्रसंगी पाहुणे भेटवस्तू देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. यजमान पाहुण्यांचे यथोचित आदरातिथ्य करतात. देण्या-घेण्याचा हा सामाजिक व्यवहार असतो. पण व्यवहार असला तरी यात आर्थिक नफा-तोट्याच्या गणिताला स्थान नसते. कोणी किती दिले यावर आदरातिथ्य ठरत नसते. सर्वांचे आदरातिथ्य एकसारखेच होते.
               आर्थिक परिस्थिती चांगली नसतांना अहंपणाला दूर ठेवावे लागते. पण आर्थिक श्रीमंती आली की विनय कमी होऊ लागतो. मध्यम वर्गीय सवय असते की कर्ज लवकरात लवकर फेडून टाकायचे. गरीबांना ते शक्य नसते. थोडा पैसा आला की कर्ज फेडून आपण काहीतरी ’ग्रेट’ केल्याची भावना निर्माण होऊन मनाला शांती मिळते.
                गरीब असतांना मिळालेली भेटवस्तू आपण चूपचाप ठेवून घेतो. आपल्याला परवडेल असाच अहेर देतो. आपल्यावर काहीतरी कर्ज उरले आहे, असा विचार मनात आणत नाही. ज्यांच्या मनात असा विचार येतो ते श्रीमंतांशी सामाजिक संबंध ठेवणे टाळतात. पुष्कळसे श्रीमंत लोकही अशा देण्या-घेण्याचे आर्थिक गणित मांडित नाही. सर्वसाधारणपणे असे कर्ज अन्य प्रकारे फेडण्याचा प्रयत्न केला जातो. वाढदिवशी भेट मिळाली तर ती देणाऱ्याच्या मुलीच्या डोहाळ-जेवणाच्या वेळी भेट दिली जाते. असे रहाट-गाडगे चालत राहते.
               पण श्रीमंतीमुळे काही लोक अधीर होऊ लागले आहेत. असे सामाजिक कर्ज ताबडतोब फेडून टाकण्याकडे कल वाढू लागला आहे. भाउबिजेला भावाने ओवाळणी टाकण्याचाच अवकाश की बहिणीने भावजईला हळद-कुंकू लावून भेट दिलीच समजा. वाढदिवशी रिटर्न-गिफ़्टची प्रथा चांगलीच जमलेली आहे. आदरातिथ्य आणि भेटवस्तूंच्या देण्याघेण्याने ’फिटंमफाट’ होते, असा पूर्वी समज होता. पण आपण नाही का नातेवाईकांना लग्न-सोहळा संपल्यावर परत जातांना लाडू-चिवड्याबरोबर अहेर देत! तसाच काहीसा प्रकार खूप साऱ्या समारंभात दिसायला लागला आहे.
               आप्तमित्रांकडून भेट घेण्यात कमीपणा वाटू लागल्यामुळे काही लोक निमंत्रण पत्रिकेत ’भेटवस्तू आणू नये’, अशी टीप घालू लागले आहेत. पाहुण्यांनी रिकाम्या हाताने उत्सव-मूर्तींना कोरडे आशिर्वाद द्यावेत, असाच या टीपेमुळे अर्थ व्यक्त होतो. या टीपेवर तोडगा म्हणून पाहुणे पुष्पगुच्छ देऊ लागले तर त्यावरही बंदी यायला लागली आहे. घनिष्ट आप्त-मित्रांची अशा टीपेमुळे कोंडी होते, हे यजमान विसरतात. 
               मजा अशी की अशी टीप लिहिणारेच लाडू-चिवड्याबरोबर अहेर देण्यात आग्रही असतात. याशिवाय असेही लक्षात आले आहे की हे लोक भूतकाळात नेहेमीच सर्व समारंभात अगत्याने अहेर देत आलेले असतात. अशा टीपेमुळे नाराज झालेल्या एका नातेवाईकाने ’तुम्ही अमक्यावेळी दिलेला अहेर परत करीत आहे’, असे सांगून यजमानाला ’टीप’ गिळायला लावली. यजमानाच्या घरी जाऊन आपली भेटवस्तू ठेवून येणे, हा तोडगा लोकांना आवडू लागल्याचे दिसते.
              सामाजिक व्यवहार आर्थिक तराजूने तोलल्यास संबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतो, हे सगळ्यांनी समजायला पाहिजे. अहेर देणे सीमेच्या पलिकडे गेले की घेणाऱ्याच्या मनात कर्ज झाल्याची भावना येते, हे लक्षात ठेवले पाहिजे. पुष्पगुच्छ/भेटवस्तू घेणे बंद करायचे असेल तर आदरातिथ्यही बंद करायला पाहिजे. मग समारंभांना काही अर्थच उरणार नाही. माणूस उत्सवप्रिय सामाजिक प्राणि आहे. आनंद हिरावून घेणाऱ्या प्रथांना जोरदार विरोध केला पाहिजे.